लांजा : लोकांच्या मागणीनुसार डी पी प्लॅनमध्ये आवश्यक ते बदल करणार; आमदार किरण सामंत यांची ग्वाही

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा हा लोकांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरणारा आणि भविष्यात आमच्या घरादारांवर नांगर फिरवणारा असल्याने हा डीपी प्लॅन तत्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी लांजा शहरासह कुवे गावातील नागरिकांनी शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये केली.

मात्र लोकांच्या मागणीनुसार डीपी प्लॅनमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. मात्र विकास साधायचा असेल, तर हा विकास आराखडा रद्द केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार किरण सामंत यांनी घेतली आहे.

विकास आराखडा संदर्भात लोकांना हरकत घेण्यासाठी देण्यात आलेला कालावधी हा कमी असल्याने तो वाढवून मिळावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केल्यानंतर १६ मे पर्यंत नागरिकांनी आपल्या हरकती ऑफलाइन पद्धतीने नोंदवाव्यात, अशी सूचना लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केली.

लांजा नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत (डीपी प्लॅन) लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. डीपी प्लॅनसंदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारे माहिती न देता तो जाहीर केल्याने लांजा व कुवे गावातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.

कुवे येथील नागरिकांनी संपूर्ण गावाच्या वतीने नगरपंचायतीला निवेदन सादर करून विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विकास आराखडा संदर्भात नागरिकांच्या शंका, अडचणींचे निरसन करण्यासाठी नगरपंचायततर्फे २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लांजा शहरातील आग्रे हॉल येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार किरण सामंत यांच्यासह लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, मुख्याधिकारी, प्रशासक चेतन विसपुते, नगररचनाकार रत्नागिरी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे उपस्थित होते.

या डीपी प्लॅन बाबत बैठकीत नागरिकांची बाजू मांडताना माजी नगरसेवक दिलीप मुजावर यांनी आक्रमकपणे आराखडा बाबत मुद्दे मांडले. डीपी प्लॅनमध्ये अनेक लोकांचे घरे जाणार आहेत, ९ मीटरचे रस्ते लोकांना आवश्यक नसतानाही ते प्लॅनमध्ये दाखवले आहेत त्यामुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. तर शहरातील आडापासून ते केळंबे पर्यंतच्या भागात कोणतेही ऐतिहासिक ठिकाण नाही किंवा पाणी नाही मात्र येथे नो डेव्हलपमेंट झोन दाखवण्यात आला असल्याची चुकीची बाब त्यांनी निदर्शनास आणली. यासह लांजा येथील प्रकाश लांजेकर, राजेश राणे, मंगेश आंबेकर, मंगेश लांजेकर, मारुती गुरव, खानविलकर यांच्यासह अनेक लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

दरम्यान कुवे येथील नागरिकांनी हा डीपी प्लॅन रद्द करावा अशी जोरदार मागणी केली त्यावर आमदार सामंत यांनी डीपी प्लॅन हा रद्द होणार नाही. त्यामध्ये बदल करून मिळेल चुकीचे काही होणार नाही, यासाठी जबाबदार मी आहे. मात्र विकास नको अशी भाषा नको. डीपी प्लॅनमुळे अनेकांच्या फायदा होणार आहे असे सांगितले. मात्र डीपी प्लॅन रद्द होत नसल्याने लोकांत तीव्र नाराजी आहे. भविष्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची श्यक्यता वर्तवली जाते आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 28/Apr/2025