चिपळूण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर पालिका प्रशासन आतापासूनच सज्ज झाले आहे. अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात मदतकार्यात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील यंत्रणेची शनिवारी शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात रंगीत तालीम घेण्यात आली. या चाचणीत यंत्रसामुग्री सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
२२ जुलै २०२१ च्या महापुराचा मोठा फटका चिपळूण शहराला बसला होता. वेळेत मदत कार्य न पोहोचल्याने जीवित व मोठ्या वित्त हानीला सामोरे जावे लागले होते. यातून घडा घेतलेल्या चिपळूण नगर पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनावर भर दिला आहे. नगर पालिकेकडे असणाऱ्या स्पीड बोटचे इंजिन, लाईफ जॅकेट, बोये यांसारख्या मदत कार्यातील साहित्याची शनिवारी वाशिष्ठी नदीत चाचणी घेतली. विशेष म्हणजे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी लाईफ जॅकेट परिधान करत स्पीड बोटमध्ये बसून फेरफटका मारला. यंत्रणा उत्तम स्थितीत असल्याची खात्री करून घेतली.

या वेळी उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, अग्निशमन विभागाचे अधिकारी आनंद बामणे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर, वाहन प्रमुख संतोष शिंदे, अमोल वीर, रवी सातपुते, राजेश जाधव, संदेश टोपरे, प्रवीण नाईक, दत्तात्रय होला, सचिन शिंदे, दीपक किंजळकर, सतीश गोरिवले, सुशिल सकपाळ यांच्यासह बांधकाम व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 02/MAY/2025














