रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना शनिवारपासून ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाली असून त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत आहे.
पवित्र संकेतस्थळामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येणार आहे. दोनशे गुणांच्या या परीक्षेत १२० गुण अभियोग्यता तर ८० गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती परीक्षा परिषदेने माहिती दिली.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात नावाची नोंद करताना ती आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही बदल असल्यास उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
…तर उमेदवारी रद्द करण्यात येईल
राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वीच सन २०१८ आणि २०१९मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवारांनी त्या यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 28/Apr/2025














