राजापूर शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठ्यासाठी विशेष लक्ष : आमदार किरण सामंत

राजापूर : शहराच्या आणि संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारण बाजूला सारून आपण सगळ्यांनी विकासाला गती देण्यासाठी एकसंघपणे काम केले पाहिजे. भविष्यात राजापूर शहरवासीयांना २४ तास कशाप्रकारे पाणीपुरवठा केला जाईल यासाठी आपण विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तर शहरातील पाणीपुरवठा योजनांसह रस्ते व राजापूर शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना देताना या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दिली.

शहराला नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या नवीन पर्यायी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित कामाचा शुभारंभ शनिवारी राजापूरचे आमदार किरण सामंत व राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोदवली धरणस्थळी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राजापूर तहसीलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी वैभव गारवे, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, अॅड. जमीर खलिफे, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश कुवळेकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी आ. सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या धरणाच्या उर्वरित बांधकामासह अन्य कामांसाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ८.१८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या शुभारंभानंतर आ. सामंत यांनी धरणाच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पहाणी केली.

याप्रसंगी बोलताना आ. सामंत म्हणाले, आपण सगळ्यांनी विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला सारून काम केले पाहिजे, या नवीन धरणाच्या निर्मितीने राजापूरचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. राजापूरकरांना २४ तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी आपले प्रयत्न असून, शीळ जॅकवेलकडे समांतर पाईपलाईन टाकण्याबरोबरच शहरातील जीर्ण झालेली पाणीपुरवठा वितरण व्यवस्थाही चांगली करणार असून, शहरवासीयांना पाणीपुरवठा करून पाणी टंचाईच्या संकटातून कायमची मुक्तता केली जाईल, अशी ग्वाही आ. सामंत यांनी यावेळी दिली. या धरणाच्या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचे आभार व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री उदय सामंत यांचेही आ. सामंत यांनी आभार मानले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, एड. जमिर खलिफे यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी केले. याप्रसंगी या धरण कामाचे ठेकेदार मे. विनोद कंट्रक्शनचे गदगू जाधव, विकास जाधव यांसह लांजाचे माजी नगराध्यक्ष राजू कुरूप, दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, माजी उपनगराध्य विजय हिवाळकर आदींसह शहरातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 28/Apr/2025