कोकण पर्यटनवाढीसाठी भारत पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभणार

रत्नागिरी : कोकण पर्यटनवाढीसाठी भारत पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती भाजप नेते संतोष गांगण यांनी दिली.

भारत पर्यटन विकास महामंडळाचे कमर्शियल आणि मार्केटिंग संचालक राजेश राणा यांची भाजप नेते संतोष गांगण यांनी दिल्ली येथील कार्यालयात अलीकडेच भेट घेतली.

कोकणातील पर्यटन व्यवसायाविषयी विविध घटकांवर प्रदीर्घ चर्चा झाली. रेल्वेच्या आयआरसीटीसीमध्ये जनरल मॅनेजर पदावार असलेल्या श्री. राणा यांची नुकतीच भारत पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदावर नियुक्ती झाली आहे. गेली दहा वर्षे श्री. गांगण यांचे त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यातूनच त्यांनी श्री. राणा यांची भेट घेतली.

आयआरसीटीसी पश्चिम विभागात काम केल्यामुळे श्री. राणा यांना कोंकणाविषयी संपूर्ण माहिती आहे. कोकणातील बहुतांश जनता मुंबईत राहत असल्याने बहुतेक घरे बंद असतात व फक्त काही सणाला चाकरमानी त्या घरात राहायला येतात. उत्तराखंडप्रमाणे कोकणात होम स्टे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. होम स्टेसाठी एक सर्वसाधारण दर्जा निश्चित करून आयटीडीसीने ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली.

पर्यटक पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा इको-फ्रेंडली होम स्टेला पसंत करीत आहेत. या उपक्रमामुळे बंद घरांची डागडुजी होईल आणि त्यातून घरमालक व होम स्टे व्यवस्थापन करणाऱ्याला उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने भोजन व्यवस्था, ट्रॅव्हल्स अशा विविध उद्योगांना चालना मिळेल. तसेच कोकणची संस्कृतीचा जगभरात प्रचार व प्रसार होईल. कोकणी उत्पादनांना एक उत्तम मार्केट उपलब्ध होईल. त्यामुळे कोकणच्या पर्यटन व्यवसायवाढीसाठी निश्चित मदत होईल. हा उपक्रम कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लवकरच आयटीडीसी संचालक राजेश राणा कोकणचा दौरा करणार आहेत. अशा उपक्रमामुळे कोकणच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी मदत होईल आणि त्यामुळे कोकणातून शहरांकडे स्थलांतरित होणारे तरुण स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कोकणात स्थिरावतील, अशी अपेक्षा या चर्चेत व्यक्त करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 28-04-2025