मुंबई : राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापराच्या धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. या धोरणामुळे परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २०४७ पर्यंत १८ हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख ३० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मंगळवारी मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत जहाज उद्योगाविषयी माहिती दिली.
महाराष्ट्राला मोलघ सागर किनारा आहे. ऐतिहासिक काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाचे, महाराष्ट्राचे महत्त्व मोठे आहे. जहाज बांधणी क्षेत्रात चीन ५० टक्के, जपान १५ टक्के, दक्षिण कोरिया २८ टक्के इतके योगदान आहे. हे तीन देश मिळून ९८ टक्के योगदान देतात. जगात भारताचा जहाज बांधणी क्षेत्रात २१ वा क्रमांक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० तसेच मेरीटाईम अमृतकाल व्हिजनमध्ये २०३० पर्यंत जहाज बांधणी, दुरुस्ती मध्ये भारताला जगातील पहिल्या दहा देशांत आणण्याचे उद्दीष्ट आहे, राणे यांनी सांगितले. या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा महत्वाचा मोठा वाटा असेल.
देशातील सुमारे ३३ टक्के जहाज उद्योग राज्यात सुरू व्हावा. तसेच सन २०३० पर्यंत राज्यात जहाज उद्योगांमध्ये ६ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४० हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले. या क्षेत्रात गुंतवणूक यावी यासाठी विभागाने नुकताच नेदरलँडचा दौरा केला. त्यावेळी राज्यात अडीच ते तीन हजार कोटी गुंतवणुकीची तयारी तेथील कंपन्यांनी दाखवली आहे. या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी युवक – युवतींना प्रशिक्षण देण्याची तरतुदही या धोरणामध्ये केल्याची माहिती राणे यांनी दिली.
धोरणाचे अपेक्षित फायदे… :
या धोरणाच्या माध्यमातून राज्याला एक प्रमुख जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर केंद्र बनवणे शक्य होणार आहे. या धोरणातील तरतूदीमुळे बंदर प्रकल्प विकासक नवीन जहाज पुनर्वापर प्रकल्प निर्माण करू शकतील. यामुळे बंदराचा वॉटर फ्रंट आणि जमिनीचा पुरेपूर वापर करता येणार आहे. यातून कौशल्य आणि उत्पादकता यावर भर देणारे कुशल मनुष्यबळ तयार करणे, प्रकल्प अंमलबजावणीसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत क्षेत्राला प्रोत्साहन देणे, संशोधन आणि विकासामध्ये महत्वपूर्ण गुंतवणूक तसेच सहकार्याद्वारे नाविन्यपूर्णतस चालना देणे, रोजगार निर्मिती हे या धोरणाची ध्येय असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 30/Apr/2025














