मुंबई : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये सुसूत्रता आणत काहीशा मागे असलेल्या विद्यापीठांचा दर्जा वाढवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून आता सर्व विद्यापीठांच्या विद्वत परिषदा एकत्र काम करतील. सर्व विद्यापीठांसाठी एकच शैक्षणिक वेळापत्रक असेल तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा ४० टक्के भाग ऑनलाईन पूर्ण करता येईल.
सर्व विद्यापीठातील विद्वत परिषदा आणि कार्यकारिणी मंडळे परस्परांच्या संपर्कात राहू शकतील, अशी ‘सार्क’ नावाची यंत्रणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने तयार केली आहे. सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतला आहे. महासार्क, महाराष्ट्र स्टेट अकादमी रिसर्च कौन्सिल या नवस्थापित व्यवस्थेअंतर्गत हे निर्णय राबवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक विषयांचा अभ्यासक्रम कसा असावा, विद्यार्थीहिताचे निर्णय कसे घ्यावेत, जगाबरोबर राहण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कशा प्रकारचे निर्णय घ्यावेत, या सर्व तपशिलाची आखणी ‘महासार्क’तर्फे केली जाणार आहे. ‘नॅक’ आणि ‘एनआयआरएफ मानांकनात आघाडीवर असलेली तसेच नॅकमध्ये ‘अ’ श्रेणी मिळवणारी विद्यापीठे अन्य विद्यापीठांना मार्गदर्शन करू शकतील, असे सरकारला वाटते.
‘नॅक’ तसेच एनआयआरएफ’ मध्ये महाराष्ट्रातील सहा विद्यापीठांना सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी महाराष्ट्रातील शैक्षणिक स्तर वाढावा यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, अशा प्रकारचे आदेशही देण्यात आले. यापुढे विज्ञान वाणिज्य तसेच कला शाखांमध्ये ‘कमवा आणि शिका’ अशी योजना सुरू करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्याने तयार होणाऱ्या या सर्व रचनांची पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 30/Apr/2025














