रत्नागिरी : आयडॉल शिक्षक, शैक्षणिक संस्था, शाळांची होणार बँक

रत्नागिरी : राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळांची बँक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आयडॉल शिक्षक व शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करुन घेतले जाणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक आणि शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग विद्यार्थी आणि पालकांना करुन देण्यासाठी आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळा ही संकल्पना हाती घेण्यात आली आहे.

या अंतर्गत निवड करण्यासाठी शाळांमधील विविध उपक्रम, नवीन अध्ययन पध्दती, शासकीय ध्येय धोरणांची अंमलबजावणी, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळामधील भूमिका अशा निकषांच्या आधारे आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळा यांची निवड केली जाणार आहे.

शिक्षकांची आचारविचाराची पध्दत, विद्यार्थांची दैनंदिन उपस्थिती, शिष्यवृत्ती कला, क्रीडा, सांस्कृतिक, उच्च शिक्षणातील सहभाग अशा निकषांवर समितीने शिक्षक आणि शाळांचे मूल्यमापन करण्याबाबत स्पष्ट केले आहे. आयडॉल शिक्षक व शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करुन घेण्याचेही नियोजन आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व अन्य संस्थांनी आयडॉल शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून घ्यावे. आयडॉल शाळांना भेटीचे नियोजन करावे. या शाळांमधील शिक्षकांना आणि अन्य सक्रीय सदस्यांना पालिकांच्या शाळांमध्ये अध्यापन मार्गदर्शक म्हणून घ्यावे.

आयडॉल शिक्षक, शाळा यांच्या कामाचे चित्रीकरण, कागदपत्रे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे त्यांच्या कामाचा प्रचार करावा. आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळा यांचे गटसंमेलन, परिषदांमध्ये उदभोधन ठेवणे अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राबवण्यात येत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल राज्य शासनाने टाकले आहे. त्यामधून नवनवीन उपक्रमांची माहिती समोर येणार आहे. त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होणार आहे.

तीन स्तरावर समितीची नियुक्ती
उपक्रमासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरावर समित्ती नियुक्त करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील समितीत गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता, शिक्षणतज्ज्ञ, दोन केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तर जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, दोन शिक्षण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ अधिव्याख्याता यांचा समावेश असेल. राज्यस्तरीय समितीमध्ये शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, दोन शिक्षण तज्ज्ञ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालकांचा समावेश असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 30/Apr/2025