दापोली : एस.टी. प्रवासादरम्यान महिलेचे दागिने चोरीला

दापोली : दापोली एस.टी. स्टॅन्ड ते नानटे असा प्रवास करताना एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. वैष्णवी वैभव धावले (३०, गृहिणी, रा. नानटे, कांबळेवाडी ता. दापोली जि. रत्नागिरी) यांनी यासंदर्भात दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैष्णवी धावले या २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० ते १२.४५ च्या दरम्यान दापोली एस.टी. स्टॅन्ड ते नानटे या बसमधून प्रवास करत होत्या. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील सुमारे ३५ हजार ३०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १२ ग्रॅम वजनाचे दोन डवळी असलेले, काळे मणी व सोन्याची चैन असलेले छोटे मंगळसूत्र (किंमत ३० हजार रुपये) आणि ०६ ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन (किंमत ५ हजार ३०० रुपये) यांचा समावेश आहे.

या घटनेची धावले यांनी सोमवारी सायंकाळी ७.०४ वाजता दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 30/Apr/2025