साडवली : संगमेश्वर येथील सप्तलिंगी नदीला राज्यातील आदर्श नदी म्हणून विकसित करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्धार संगमेश्वर येथे झालेल्या परिषदेत उपस्थितांनी केला.
देवरुख पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या परिषदेला देवरुख परिसरातील १८ गावांतील ग्रामस्थ ‘क्रांती व्यापारी’ आणि ‘अॅग्रोस्टार फार्म फ्रेश एफपीओ’ या संस्थांचे सदस्य उपस्थित होते. सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन आणि नदी विकास या दोन मुद्द्यांवर चर्चा केली. पहिल्या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर नदीच्या पुनरुज्जीवनचा कृती आराखडा आणि त्यावर जलद निर्णय घेण्यासाठी दुसरी परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा जलसंपदा विभागाचे श्री. तिरमारे, सामाजिक वनीकरण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नामचे कोकण प्रदेश प्रमुख जानवलकर, जलनायक युयुत्स् आर्ते, हेमंत तांबे, प्रफुल्ल भुवड, रोहन इंगळे, निखिल कोळवणकर, अण्णा बेडे आणि संदीप वेल्हाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रांती व्यापारीचे कोळवणकर यांनी सप्तलिंगी नदीचे धार्मिक, साहसी आणि जल पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत नदीचे प्रदूषण, पाण्याचा दर्जा आणि पर्यटन विकास, याविषयी माहिती दिली देवनगरी देवरूख पर्यटनाचा भाग म्हणून सप्तलिंगी दर्शनयात्रा’ सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. हेमंत तांबे यांनी शासकीय अनुभवाच्या आधारावर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जलनायक युयुत्सू आर्ते यांनी कोकणातील शेतीबाबत शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अनास्थेबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच पाटबंधारे अधिकारी तिरमारे यांनी सप्तलिंगी उपनदी असल्याने त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या. नदीप्रहरी रोहन इंगळे यांनी संयुक्त पाहणी दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित करत गावागावांतून माहिती गोळा करण्यासाठी डाटा फॉर्म तयार करण्याचे सुचविले.
तसेच जगबुडी नदीचा एक नमुना अर्जही सादर केला. सामाजिक वनीकरण विभागातर्फे बांबूसारख्या उत्पन्नदायी झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आश्वासन माळी यांनी दिले. कृषी अधिकारी आबासाहेब यांनी नदीच्या पात्राशेजारील परिसरात विशेष घन लागवडीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली.
जानवलकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने जेसीबी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली, त्यांनी गावागावांत नदी स्वच्छता स्पर्धा घेऊन ‘सप्तलिंगी चषक पुरस्कार योजना सुरू करण्याची सूचना क्रांती व्यापारीला केली. सांगवे, धामापूर, फणसट येथील ग्रामस्थांनी पाणी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडल्या.
यावेळी सर्वांनी मिळून लवकरात लवकर सप्तलिंगी नदीविकास आराखडा तयार करण्याचे ठरले, जलसंपदा विभागाने अनुपस्थित खारयांनाह सहभागी करून घ्या, असे आश्वासन दिले. सप्तलिंगी पुनरुजीवन आणि सुशोभीकरण याकरिता सर्व शासकीय यंत्रणा १८ गावे यांना क्रांती व्यापारी निश्चित सर्वतोपरी मदत करेल आणि सप्तलिंगी चषक स्पर्धा क्रांती व्यापारी आयोजित करेल, असे सांगितले.
आजपासून सर्वेक्षणाला आरंभ
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सप्तलिंगी नदीकिनारी तळवडे, हरपुडे, हातीव या गावांतून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला, तसेच किनाऱ्यावरील सर्व १८ गावांची सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन हा उपक्रम पायलट प्रकल्प म्हणून शासनाने स्वीकारावा, अशी मागणी व्यापारी आणि ग्रामस्थांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 30/Apr/2025














