मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण ते वर्षा बंगल्यावरच राहत होते.
त्यामुळे, देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरच राहत होते. त्यातच, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला कधी जाणार, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. आता, देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा (Akshaya tritiya) मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा (Varsha) बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.
”सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे,” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली. कारण, माझ्या मुलीची 10 वीची परीक्षा असल्याने मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो नाही. माझी परीक्षा झाल्यानंतर आपण वर्षा बंगल्यावर राहायला जाऊया, असे दिविजा हिने तिचे वडिल देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते. त्यामुळे, लेकीच्या परीक्षेचा विचार करुनच मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर लगेचच जाणे टाळले होते. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी माहिती देखील दिली होती.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं स्पष्टीकरण
”एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथं जायचं आहे, तिथं बंगल्यावर काही छोटी-मोठी कामंही होणार आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी 10 वी मध्ये शिकत आहे, ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिथं शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथं लगेच शिफ्ट झालो नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, इतक्या वेड्यासारख्या चर्चा, माझ्या स्तराच्या माणसाने अशा प्रश्नावर उत्तरही देऊ नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.
संजय राऊतांच्या दाव्याने उडाली होती खळबळ
दरम्यान, वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न राहण्याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी वेगळाच दावा केला होता, वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरली असून कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, देवेंद्र फडणवीसांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले होते. अखेर आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सप्तनीक पू्जा करुन आज गृहप्रवेश केल्याने वर्षा बंगल्यात राहायला जाण्याचा विषय आता संपुष्टात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 30-04-2025














