देवरूख : कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परिसरातील १८ गावांतून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीच्या पुनरुज्जीवन आणि नदी विकासासाठी ‘क्रांती व्यापारी’ आणि ‘ऍग्रोस्टार फार्म फ्रेश एफपीओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी सप्तलिंगी परिषद नुकतीच छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती देवरुख येथे सोमवारी उत्साहात पार पडली.
या परिषदेत ३० एप्रिल अक्षय तृतीयापासून तळवडे, हरपुढे, हतीव या गावांतून नदी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. सर्व १८ गावांची सकारात्मक भूमिका पाहता हा उपक्रम पायलट प्रकल्प म्हणून शासनाने स्वीकारावा, अशी अपेक्षा क्रांती व्यापारी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आमदार शेखर निकम यांना तातडीने मुंबईला रवाना व्हावे लागले, त्यामुळे ते या परिषदेला स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या होत्या. मात्र अनेक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल परिषदेत नाराजी व्यक्त झाली. दसरी सप्तलिंगी परिषद सकाळी ११.२० वाजता गोलमेज चर्चासत्र स्वरूपात सुरू झाली.
या परिषदेत सप्तलिंगी नदीला राज्यातील आदर्श नदी म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
क्रांती व्यापारीचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी सप्तलिंगी नदीचे धार्मिक, आणि जल पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत नदीचे प्रदूषण, पाण्याचा दर्जा आणि पर्यटनविकास याविषयी सविस्तर माहिती दिली. देवनगरी देवरुख पर्यटनाचा भाग म्हणून ‘सप्तलिंगी दर्शन यात्रा’ सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेमंत तांबे यांनी शासकीय अनुभवाच्या आधारावर विविध अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. युयुत्सु आर्ते यांनी कोकणातील शेतीबाबत शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अनास्थेबद्दल चिंता व्यक्त केली.
तिरमारे यांनी सप्तलिंगी नदी उपनदी असल्याने येणाऱ्या अडचणी स्पष्ट केल्या व त्यावर उपायही सुचवले. नदी प्रहरीचे रोहन इंगळे यांनी संयुक्त पाहणी दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित करत गावागावांतून माहिती गोळा करण्यासाठी डेटा फॉर्म तयार करण्याचे सुचवले. त्यांनी जगबुडी नदीचा एक नमुना फॉर्म सादर केला.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे बांबूसारख्या उत्पन्नदायी झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आश्वासन माळी यांनी दिले. कृषी अधिकारी आबासाहेब यांनी नदीच्या कॅचमेंट एरियात बंधारे आणि विशेष घन लागवडीचा प्रस्ताव तयार करण्याची माहिती दिली. नाम फाऊंडेशनचे जानवलकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने जेसीबी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी गावागावांत नदी स्वच्छता स्पर्धा घेऊन ‘सप्तलिंगी चषक’ पुरस्कार योजना सुरू करण्याची सूचना क्रांती व्यापारीला केली.
सांगवे, धामापूर, फणसट येथील ग्रामस्थांनी नदीचे महत्त्व अधोरेखित करत पाणीप्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. परिषदेत निर्णय प्रक्रियेवर भर देत लवकरात लवकर सप्तलिंगी नदी विकास आराखडा तयार करण्याचे ठरले. जलसंपदा विभागाने अनुपस्थित खात्यांनाही सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले.
सप्तलिंगी पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण या साठी सर्व शासकीय यंत्रणा १८ गावे याना क्रांती व्यापारी निश्चित सर्वतोपरी मदत करेल आणि सप्तलिंगी चषक स्पर्धा क्रांती व्यापारी आयोजित करेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 01/May/2025














