रत्नागिरी : राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत गावांगावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव स्वच्छ ठेवणे हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहिमेचा शुभारंभ आज (१ मे) रत्नागिरी तालुक्यातील पानवल ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “गावातील सर्व कुटुंबातील कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे. तसेच कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करून गावातील फळझाडे व शेतीसाठी त्याचा उपयोग करून गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. तसेच या अभियानाची प्रचार प्रसिध्दी गावसभा घेऊन सर्व कुटुंबापर्यंत हा संदेश पोहचला पाहिजे.”
या अभियानाची माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल देसाई म्हणाले की, “गावातील लोकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. तसेच हे अभियानामध्ये गाव स्वच्छ सुंदर करून लोकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची स्वच्छता सातत्यपूर्ण ठेवावी. तसेच प्रत्येक कुटुंबातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन गावातील सार्वजनिक नॅडेप खड्डा या मोहिमेत भरून त्याचे खत निर्माण करून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळाले पाहिजे. जेणेकरून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यास मदत होईल.”
या कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके, विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे, जिल्हा कक्षातील सर्व सल्लागार, पानवल ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती तनिष्का होरंबे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार उपसरपंच रवींद्र मांडवकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 01/May/2025










