रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेतील नोकर भरतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खेड लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूटच्या केंद्रावर घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा नेटवर्कमधील अडथळ्यामुळे रद्द केली होती. ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुन्हा घेण्यात आली. तसेच मागील परीक्षेवेळी हजर राहिलेल्या उमेदवारांना आर्थिक भूर्दंड बसू नये म्हणून प्रवासखर्चापोटी पाचशे रुपये बँकेकडून देण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाईन भरती प्रक्रियेसंदर्भात १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, विनोज टेक सेंटर, खेर्डी (चिपळूण) व ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, बोरज (ता. खेड) या चार केंद्रावर तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते; परंतु त्या चार परीक्षा केंद्रांपैकी घरडा येथील केंद्रावर नेटवर्कसंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे १ सप्टेंबरची परीक्षा रद्द करण्यात आली. त्या केंद्रावर तीन सत्रांतील परीक्षा देण्यासाठी उपस्थित असलेल्या परीक्षार्थीनी प्रवासखर्चाची रक्कम मिळावी, अशी मागणी केली होती. बँकेने त्या परीक्षार्थीना प्रवासखर्चापोटी काही रक्कम देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळ सभेत परीक्षार्थीना परत परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे प्रवासखर्चापोटी ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. घरडा केंद्रावरील नेटवर्कमधील तांत्रिक बिघाड दूर न झाल्यामुळे पुढील तीन दिवसांची ऑनलाईन परीक्षाही रद्द करण्यात आली होती. त्या केंद्रावरील रद्द झालेली परीक्षा अन्य तीन परीक्षा केंद्रांवर ५ व ६ ऑक्टोबरला घेण्यात आली. ऑनलाईन परीक्षेवेळी हजर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासखर्च देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 10-10-2024














