चिपळूणमध्ये अवैध वाळू उपसाविरोधात उपोषण करणारे श्रीकांत कांबळी यांनी थेट नदीत उडी घेतल्याने खळबळ..

चिपळूण : गोवळकोट आणि दाभोळ खाडीतील अवैध वाळू उपसा विरोधात चिपळूणमध्ये उपोषणाला बसलेल्या श्रीकांत कांबळी या तरुणाने थेट नदीत उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, वेळीच चिपळूण पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले.

श्रीकांत कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून गोवळकोट आणि दाभोळ खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या विरोधात उपोषण करत होते. प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या कांबळी यांनी काल नदीपात्रात उडी घेतली. या घटनेत त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने कामथे येथील जिल्हा उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी, रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसाण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, प्रशासनाने अवैध वाळू उपसा होणारे काही विशिष्ट मार्ग शोधले असून, या प्रत्येक मार्गावर स्थिर पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू असून लवकरच याची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याने अनेकांचे हितसंबंध दुखावले जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:48 AM 02/May/2025