Rajasthan Royals VS Mumbai Indians IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सने विजयी षटकार मारला आहे. जयपूरमध्ये हार्दिक आणि त्यांच्या कंपनीने दणदणीत विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्सने 13 वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवला.
राजस्थानचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईने 100 धावांनी सामना जिंकला. या विजयासह, हा संघ आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मोठा धक्का बसला आणि पॉइंट्स टेबलमध्ये त्यांची एका स्थानांनी घसरण झाली. यासह, रियान परागचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ बनला. त्यांच्या आधी चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते.
मुंबईचा राजा रोहित शर्मा पुन्हा तळपला!
जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. ऑनफिल्ड पंचांनी आउट दिल्यानंतर हिटमॅनने डीआरएस घेतला आणि वाचला. यांनतर या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि रिकेल्टनसोबत पहिल्या विकेटसाठी 116 धावांची शानदार शतकी भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी आरआरविरुद्ध शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ होती.
रिकल्टनने शानदार फलंदाजी केली आणि 38 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. त्याच वेळी, रोहितने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 53 धावा करून आऊट झाला. या खेळीच्या मदतीने रोहितने आयपीएलमध्ये मोठी कामगिरीही केली. खरं तर, रोहित आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 6000 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. दोघेही आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने जबाबदारी घेतली.
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचा दणका!
दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी झाली. यादरम्यान, सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत 48* धावा केल्या. त्याच वेळी, एमआय कर्णधारानेही त्याच संख्येच्या चेंडूंवर तेवढ्याच धावा केल्या. पांड्याने त्याच्या नाबाद खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. अशाप्रकारे, या चार फलंदाजांच्या खेळीच्या मदतीने मुंबईने संपूर्ण षटके खेळल्यानंतर 2 विकेट गमावून 217 धावा केल्या. राजस्थानकडून रियान पराग आणि महिश तिक्ष्णाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा नापास
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात त्यांनी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची विकेट गमावली, ज्याला दीपक चहरने खातेही न उघडता बाद केले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने यशस्वी जैस्वालला (13) आणि नितीश राणालाही (9) आऊट करून राजस्थानला तिसरा धक्का दिला. मग जसप्रीत बुमराह देखील मागे राहणार नव्हता. बुमराहने डावाच्या पाचव्या षटकात रियान पराग (16) आणि शिमरॉन हेटमायर यांना सलग चेंडूंवर आऊट करून राजस्थानची परिस्थिती आणखी खराब केली. हार्दिक पांड्याने आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ‘इम्पॅक्ट खेळाडू’ शुभम दुबेला (16) आऊट केले आणि राजस्थानच्या जिंकण्याच्या आशा संपवल्या.
तेथून राजस्थान रॉयल्सच्या विकेट पडत राहिल्या आणि त्यांना पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 30 धावा (27 चेंडू, 2 चौकार आणि 2 षटकार) केल्या. मुंबईकडून कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला दोन यश मिळाले. हार्दिक पांड्या आणि दीपक चहर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 02-05-2025














