पोलिस असल्याची बतावणी करत चिपळुणात वृद्धेचे दीड लाखाचे दागिने लांबवले

चिपळूण : चिपळुणात तोतया पोलिसांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील राधाकृष्णनगर येथे पोलिस असल्याची बतावणी करत एका वृद्ध महिलेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. वृद्धेला लुटण्याची शहरात पंधरा दिवसांत दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिपळूण या परिसरात पोलिस असल्याची बतावणी करीत वृद्धांना लुटण्याची टोळीच सक्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने अशा घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांना या घटनेवर आळा घालता आलेला नाही. शहरातील राधाकृष्ण नगर येथील मुतप्पन मंदिरात नवरात्रोत्सव सुरू आहे. या ठिकाणी देवी दर्शनासाठी एक वृद्ध महिला आली आणि दर्शन घेतल्यानंतर ती परत जात असताना मोटार सायकलवर आलेल्या दोघांनी आपण पोलिस आहोत आता चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे काळजी घ्या, तुम्ही वृद्ध आहात त्यामुळे चोरटे तुमचे दागिने पळवून घेऊ शकतील.

तुमच्या जवळ असलेले दागिने आमच्याकडे द्या, आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी या दोघा तोतयांनी केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या वृद्ध महिलेने आपल्या जवळील सुमारे दीड ते दोन लाखांचे दागिने त्यांच्या हवाली केले. या नंतर हे दोघे मोटार सायकलने पसार झाले. आपण फसल्याचे लक्षात येतात संबंधित वृद्ध महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दोन अज्ञात व्यक्तींवरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेने पोलिसांसमोर या चोरट्यांना आणि बनावट पोलिसांना शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 10/Oct/2024