रत्नागिरी : कर्करोग रोखण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख मुलींना देणार लस

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९ ते १४ वर्षांच्या १ लाख मुलींना कर्करोगापासून संरक्षण व्हावे, यासाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी ६ कोटींची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार मुलींना लस दिली जाणार आहे. असा मोठा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

जिल्हा विकास योजनेचा गतवर्षी १०० टक्के निधी खर्च झाला आहे. २०२५-२६ साठीच्या ४०६ कोटींचा विकास आराखडा आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार किरण ऊर्फ भैया सामंत, शेखर निकम, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नारायण राणे व मंत्री योगेश कदम है दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्हा विकास नियोजनची शुक्रवारी झालेली सभा खेळीमेळीत झाली. काही लोकप्रतिनिधी ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे गेल्यावर्षी ३११ कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तो १०० टक्के खर्च केला. पुढील आर्थिक वर्षासाठी ४०६ कोटींचा विकास आराखड्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महिलाना कर्करोग होऊ नये, यासाठी एचपीव्ही ही लस देण्यात येणार आहे. ही लस सायकल कॅन्सरपासून संरक्षण देणारी आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

पहिल्या टप्प्यात ५० हजार मुलींना ही लस दिली जाणार आहे. शाळांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. तसेच कॅन्सरच्या निदानासाठी मॅमोग्राफी टेस्ट केली जाणार आहे. रुग्णवाहिका वाढविणे, लोकमान्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करणे, कोरोना महामारीच्या काळातील यंत्रणा इकडे कशी वापरता येईल, याचा विचार सुरू आहे. अधिकच्या खाटा, डायलेसीस युनिट, ऑक्सिजन युनिट आदीच्या वापराबाबत विचार सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, वन विभागाने दिलेल्या अहवालानुसार ५ लाखांपैकी ३ लाख ७० हजारांवर खैराची झाडे तयार आहेत. ती शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरूच आहे. बेरोजगारी दूर व्हावी, यासाठी विविध प्रकल्प आणले जात असल्याचे ते म्हणाले.

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी नेटवर्कबाबतच्या समस्या तीन महिन्यात अभ्यास करून सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 03/May/2025