मानसिकता असेल तर कामे होतात : पालकमंत्री उदय सामंत

राजापूर : संकुचित मानसिकतेमुळे गेल्या दहा वर्षात राजापूरचा विकास होऊ शकलेला नाही त्यामुळे आम्ही राजापूर, लांजाकडे विशेष लक्ष पुरविलेले असून, मानसिकता असेल तर काम उभे राहू शकते. याचे उदाहरण म्हणजे राजापूर शहरवासीयांसाठी होत असलेली ही विस्तारीत नळपाणी पुरवठा योजना आणि नव्या धरणाचे काम होय. पुढील वर्षी रत्नागिरीप्रमाणे राजापुरात कॅशलेस हॉस्पिटल उभारले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केली.

राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तसेच कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरीत कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. यावेळी मात्री आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे आणि माजी नगराध्यक्ष इनिफ काझी उपस्थित होते.

याप्रसंगी ना. सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्याच नाही तर कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत आहोत, भविष्यात रत्नागिरीप्रमाणेच राजापूरसह खेड, चिपळूण या नगर परिषदांना भरघोस निधी देऊन त्यांचा कायापालट करू, अशी ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी माजी आमदार खलिफे यांनी मनोगत व्यक्त करताना या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देतानाच ना. उदय सामंत यांनी हे महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांची माहिती देत शहराच्या विविध विकासकामांसाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे तीस कोटी तर कोदवली येथील नवीन धरणाच्या वाढीव कामासाठी ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाला सर्व माजी नगरसेवक, व्यापारी, नागरिक महिला वर्ग अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायबाच्या धरणाचे नाव बदलावे..
यावेळी त्यांनी १९४७ सालीच साहेब हा देश सोडून इंग्लंडला निघून गेले त्यामुळे त्यांच्या नावाची ओळख असलेल्या सायबाच्या धरणाचे नाव बदलून राजापूरच्या अस्मिता जपणारे नाव या धरणाला दिले जावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 10/Oct/2024