रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भूजल पातळी घटली असून, धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढणारे तापमान तीव्र पाणीटंचाईकडे वाटचाल करत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. चालू महिन्यात जिल्ह्यातील ४६ लघु पाटबंधारे धरणांमध्ये प्रचंड बाष्पीभवनामुळे आठवडाभरात सुमारे २.८८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा घटला आहे.

आता या धरण प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ९७.२३ दशलक्ष घनमीटर शिल्लक राहिला असून, याची एकूण टक्केवारी ४१.१३ आहे. अजून दीड महिना याच पाण्यावर काढायचा असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि ४६ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. यापैकी नातूवाडी, गडनदी, अर्जुना या मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा घटला आहे. नातूवाडीमध्ये १०.९९८ दलघमी, गडनदीमध्ये ५३.४८० दलघमी, तर अर्जुना धरण प्रकल्पात ४६.४८० दलघमी पाणीसाठा होता. असह्य उकाड्यामुळे आठवड्याभरात या धरणांमधील पाणीसाठा घटला आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नातूवाडी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ९.९३० दलघमी (३६.४७ टक्के), गडनदी प्रकल्पात ५१.८१२ दलघमी (७८.०५ टक्के), तर अर्जुना प्रकल्पामध्ये ४४.६५८ दलघमी (६१.५५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून ते जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

२० गावांना टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात सध्या २० गावांतील ४५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एकूण २० हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेषतः रत्नागिरी शहरानजीकच्या गावांना सर्वाधिक पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 03/May/2025