चांगल्या पुस्तकात ज्ञानसंपदा असते : बालसाहित्यिक मदन हजेरी

रत्नागिरी : चांगल्या बँकेत पैसा असतो. मात्र, चांगल्या पुस्तकात चांगली ज्ञानसंपदा असते. त्यामुळे जास्तीत जास्त विविधांगी पुस्तकांचे वाचन करून त्यातून जास्तीत जास्त माहिती मिळवा. त्याचा स्वतःच्या प्रगतीसह समाजपरिवर्तनासाठी उपयोग करा, असा सल्ला प्रसिद्ध बालसाहित्यिक मदन हजेरी यांनी दिला.

विखारेगोठणे (ता. राजापूर) येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा झाला. या समारंभात श्री. हजेरी बोलत होते.

यावेळी त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर त्यांच्यासह डॉ. घनश्याम हराळे, प्रा. एस.एम.कांबळे, प्रा. एस. व्ही. पिंजारी, प्रा. शैलेंद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना श्री. हजेरी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजपरिवर्तन केले. तोच वसा नव्या पिढीनेही पुढे चालवावा. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. कलाम यांचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा. त्यासोबत देशासाठी आपण काय करू शकतो, याचाही प्राधान्याने विचार करावा. मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय भाषण करताना डॉ. राठोड यांनी आयुष्यात केवळ ज्ञान असून चालत नसून ज्ञानासोबत कौशल्यही असणे गरजेचे आहे. त्यासाठी सतत विविधांगी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 03-05-2025