रत्नागिरी : साखरतर पुलावर तरुणावर हल्ला; तरुण जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साखरतर पूल परिसरात ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. येथे ४३ वर्षीय व्यक्तीने २० वर्षीय तरुणावर दारूच्या रिकाम्या काचेच्या बाटलीने हल्ला करून त्याला गंभीर दुखापत केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगदस मोहम्मद शफी कर्लेकर (वय २०) हे साखरतर पुलाजवळ त्यांच्या सुझुकी इको (क्र. एमएच-०८/झेड/८९६४) गाडीतून नातेवाइकांना खाली उतरवत होते. यावेळी ते पुन्हा गाडीत बसत असताना आरोपी समीऊल्ला अब्दल सलाम होडेकर (वय ४३) तिथे आला. एक दिवस आधी म्हणजेच ३ मे २०२५ रोजी साखरतर रहेबर मोहल्ला स्मशानभूमीत हात धुताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात बाचाबाची झाली होती. याच रागातून आरोपीने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस दारूची रिकामी काचेची बाटली मारली.

या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी आरोपीने फिर्यादीला ढकलल्याने ते जवळच्या टेम्पोवर आपटले. इतकेच नाही, तर आरोपीने फिर्यादीला जमिनीवर पाडून शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेची तक्रार फिर्यादीने रात्री ११:४७ वाजता रत्नागिरी पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा (क्र. १९०/२०२५) दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 05-05-2025