HSC Result 2025 Declared: यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, मुलं आणि मुलींच्या निकालात किती आहे फरक?

Maharashtra Board 12th Result 2025 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली.

प्रत्यक्षात निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.

बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 05-05-2025