चिपळूण : ज्या जनतेने राजकारणात आमची ओळख महाराष्ट्रभर केली अशा जनतेच्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी हजर राहणे माझे कर्तव्य आहे. सात महिन्यांत दहा हजारांवरून ५० हजारांपर्यंत कामगारांची नोंदणी करणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले.
चिपळूणमधील सांस्कृतिक केंद्रामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या विभागामार्फत शनिवारी बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार कल्याण केंद्राचे आयुक्त संदेश आयरे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, सचिन कदम, प्रकाश देशपांडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, न.प. चे मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चिपळुणातील सांस्कृतिक केंद्रामध्ये कामगार कल्याण मंडळाच्या विभागामार्फत शनिवारी बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले, कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या ३२ विविध योजना आहेत. याचा कामगारांनी लाभ घ्यावा. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदणीकृत कामगारांना लवकरात लवकर ओळखपत्र द्यावे. ज्या जनतेने आम्हाला राज्यभर राजकीय ओळख करून दिली त्या जनतेच्या हितासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे. त्यातूनच लाडकी बहीण योजना, महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत तर शेतकऱ्यांच्या हुशार मुलींकरिता अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण योजना राबविणारा रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला ठरला असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. कामगार कल्याण मंडळातर्फे चिपळुणमध्ये सात महिन्यात दुसऱ्यांदा कार्यक्रम होत आहे.
या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सुरुवातीच्या दहा हजार नोंदीत तब्बल ५० हजार कामगरांची नोंद करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे. ज्या कामगार मतदारांमुळे आम्ही राज्यभर ओळखले गेलो, त्यांच्या विकासासह त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे आमचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. कामगारांची नोंदणी वाढवा. त्यांना शासनाच्या योजनांची माहिती द्या. योजनेचा लाभ तळागाळातील कामगारांना मिळावा यासाठी त्यांना ओळखपत्र द्या, अशी सूचना मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना केली.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
सध्या विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून टीका सुरू आहे. निवडणुकीपूर्वीही विरोधक अशीच टीका करत होते; मात्र स्वतः जाहीरनाम्यात दुप्पट रक्कम देण्याचे वचन देत होते. कारण, त्यांना माहीत होते की, आपण निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अशी वचने दिली. जोपर्यंत महायुती शासन आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योग्यवेळी त्या रकमेत वाढ केली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 05/May/2025










