चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाने पहलगाम हल्ल्याचा निषेध करत मृतांना अर्पण केली श्रद्धांजली

चिपळूण, 06 मे 2025 : चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक स्नेहमेळाव्याचे आयोजन संघाच्या कार्यालयात उपाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या मेळाव्यात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मेळाव्याला सचिव रत्नमाला कळंबटे, कोषाध्यक्ष विजय बापट, अशोक भुस्कुटे, नीला पेंडणे, मंजिरी नरवणे, अंजली गोंधळेकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकेचे व्यवस्थापक चांदोरकर आणि सहायक अधिकारी सुर्वे उपस्थित होते. सुरेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी संघाचे सभासद अशोक भुस्कुटे यांची दिव्यांग समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

बँक योजनांवर मार्गदर्शन: सारस्वत बँकेचे व्यवस्थापक चांदोरकर यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

मेळाव्यात बळवंत डंबे आणि अपर्णा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विजयालक्ष्मी भोसले यांनी सादर केलेल्या कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कुंदा भागवत, उदय वेल्हाळ, लक्ष्मण कांबळे, मधुकर तेरेदेसाई, प्रताप गजमल, प्रकाश आंबुर्ले आणि बजरंग दाभोळे यांनी सहकार्य केले. उस्मान बांगी, नंदकुमार तांबे, माधवी भागवत, दिलीप पाटील आणि गनी वनकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जाणीव आणि एकता दर्शवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 06/May/2025