राजापुरातील ३ गावांची टँकरची मागणी

राजापूर : मे महिना तीव्र उष्म्याची आग ओकत असतानाच राजापूर तालुक्याच्या दोन गावांमधील वाड्यांनी गत महिन्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केलेली होती. आता त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात कोंडेतर्फे सौंदळ या गावाची भर पडली आहे.

त्यामुळे आता तालुक्यातील तीन गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली असली, तरी एकाही गावाला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मात्र, टँकरमुक्त तालुका अशी कागदोपत्री नोंद केलेल्या राजापूर पंचायत समितीमार्फत यावेळीही पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे भ्रामक आश्वासन दिले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये तापमान आणि हवेतील उष्मा कमालीचा वाढला असून पाण्याची सर्वत्र पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदाही तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. गतवर्षी तालुक्यामध्ये पाण्याचा खासगी टैंकर धावत असला, तरी मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये गतवर्षी धावलेल्या टँकरची संख्या तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्मा आणि तापमान वाढले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्यामध्ये दमदार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्याला ग्रामपंचातीचा पुढाकार आणि श्रमदानातून गावोगावी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये झालेल्या मुबलक पाणीसाठ्याचीही साथ मिळत आहे.

तालुक्यातील आडवली, पुजारवाडी, मोगरे सडेवाडी या गावांनी गतमहिन्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये आता कोंडेतर्फ सौदळनेही एका वाडीसाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. दिवसेंदिवस तापमानातील वाढ पाहता पाणीटंचाईच्या गावांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागल्यास पंचायत समितीकडे स्वतःचा टँकर उपलब्ध नाही. पंचायत समितीचा असलेला टँकर तीन वर्षांपूर्वी लांजा पंचायत समितीला देण्यात आला आहे. त्यामुळे राजापूर पंचायत समितीवर खासगी टैंकर घेऊन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याची वेळ यंदाही येणार आहे. खासगी टँकर हा कोणाला फायदेशीर ठरतो, याची मोठी चर्चा तालुकावासीयांत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 07/May/2025