खेड : तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाने जलसंधारणासाठी दोन बंधारे आणि तीन विहिरींसह कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही गावातील महिलांना आजही मैलोनमैल फक्त १ हंडा पाण्यासाठी चालावे लागत आहे.
गावाला आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाच्या योजनेतून २०१८ १९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२ लाख रुपये खर्चुन सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जामुळे तो काही महिन्यांतच वाहून गेला आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागले. गेल्यावर्षी २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ४९.३१ लाख रुपयांची तरतूद करून नव्या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. पण, या वर्षीच्या पावसाळ्यानंतरही त्या बंधाऱ्यात पुरेशी पाणी साठवण होऊ शकली नाही. गावकऱ्यांचा आरोप आहे की, या कामातही दर्जाचा पूर्ण अभाव होता, त्यामुळेच आजही त्यांना पाणी-पाणी म्हणत आहे. जगावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.
पाणी म्हणजे जीवन, असे म्हटले जाते; मात्र वडगावकरांना याच जीवनासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठी शंका निर्माण करणारी बाब ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 07/May/2025













