चिपळूण : गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शहरातील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीत शहरासह खेर्डी, मतेवाडी, गांधीनगर, कळंबस्ते येथील गणेशमूर्तीचे विसर्जन होते. मात्र, या ठिकाणचा जुना पूल तोडल्यानंतर नदीत जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गणेश विसर्जन घाट अजूनही बांधण्यात आलेला नाही. या बाबत माजी सभापती शौकत मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत खडेबोल सुनावले.
गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र, बहादूरशेख येथील जुना पूल तोडल्यानंतर नदीत गणेश विसर्जनासाठी जाण्यास रस्ता राहिलेला नाही. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गणेश विसर्जन घाट बांधून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, माहिती घेतली असता नगर परिषद या ठिकाणी गणेश विसर्जन घाट बांधणार आहे असे महामार्ग विभागाचे अधिकारी सांगत आहेत. तर नगर परिषदेकडून महामार्ग विभागाकडे बोट दाखवण्यात येत आहे. यामुळे गणेश विसर्जन घाट बांधण्याबाबत चालढकल सुरू आहे.
या ठिकाणी बहादूरशेख, कळंबस्ते, खेर्डी, मतेवाडी, चिपळूण शहर आदी ठिकाणच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मात्र, यावर्षी अडचण निर्माण होणार आहे. या बाबत माजी सभापती शौकत मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक देत जाब विचारला.
या बाबत मुकादम म्हणाले, अनेकवेळा वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतात व साईटवर गेलो असे सांगितले जाते. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे त्याची रजिस्टवर नोंद केली जात नाही. यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारी साईटवर आहेत की अन्य कुठे हेच समजत नाही. त्यामुळे कुठल्या साईटवर, कुठल्या जागी, कोणत्या कामासाठी जात आहात याची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये केली पाहिजे, असेही मुकादम यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
दरम्यान, महामार्गाच्या कामासाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या बाजूलाच असल्याने संबंधित ठिकाणी अपघात घडत आहेत. कळंबस्ते अंडरपास येथे लाईटची व्यवस्था नाही. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्व समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी मुकादम यांनी यावेळी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 07/May/2025














