रत्नागिरी : गेला आठवडाभर येथील श्री पतित पावन मंदिर संस्था आणि भजनी बुवांमधील वाद चिघळल्याचे दिसत आहे. या दोघांमधील कोणत्याही वादात ब्राह्मण समाजाचा संबंध नसताना हेतुपुरस्सर जाणूनबुजून नाहक त्यांची बदनामी केली जात आहे.
संबंधित वादामध्ये ब्राह्मण समाजाचा दूरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरीतील काही व्यक्ती विविध जातींमध्ये असलेला जातीय सलोखा धोक्यात आणून विविध जाती-जातींमध्ये द्वेष पसरवून, समाजामध्ये वादविवाद निर्माण करून, जातीत तेढ पसरवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजमाध्यमांवरील याबाबतच्या बातम्यांमुळे वादंग निर्माण होत आहेत. अशा अपप्रवृत्तीला पायबंद घालून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न उद्भवू नये, म्हणून वेळीच योग्य ती समज देऊन कठोर शासन करण्यात यावे. तसेच त्यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी. शांतताप्रिय म्हणून नावलौकिक असलेल्या ब्राह्मण समाजाला न्याय मिळावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे कार्यवाह राजन पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे, रविकांत शहाणे, सुधाकर वैद्य यांनी निवेदन दिले. जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस निरीक्षकांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 08-05-2025














