राजापूर तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहिमेला वेग

राजापूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेला राजापूर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण ९७७ मृत खातेदार असून, या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६२४ वारस नोंदणीचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘मृत’ सातबारा आता ‘जिवंत’ होण्याच्या मार्गावर आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, गावातील चावडीवर मृत खातेदारांच्या सातबाऱ्यांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वारसांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांची पडताळणी करण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, ई-हक्क प्रणालीमध्ये वारस नोंदीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यानुसार नियमानुसार ठराव मंजूर करण्यात आले. सध्या, फेरफारसाठी दाखल झालेले अर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या २७० प्रकरणांपैकी ४८ प्रकरणे मंजूर झाली आहेत.

दरम्यान, शासनाने या मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. या टप्प्यात सातबाऱ्यावरील कालबाह्य आणि अनावश्यक नोंदी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विशेषतः अपाक नोंदी, सावकारी नोंदी, विविध प्रकारचे बोजा, नजर गहाण आणि सावकारी कर्ज नोंदी काढणे, तसेच महिला वारसांच्या नोंदी अद्ययावत करणे यांसारख्या कामांचा समावेश असणार आहे. तालुक्याचे तहसीलदार विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन ‘जिवंत सातबारा’ मोहीम प्रभावीपणे राबवत आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ई-हक्क प्रणालीत १८८ वारस नोंदणी अर्ज दाखल झाले असून, ६२४ वारस ठराव निर्णय संख्या पूर्ण झाली आहे. दाखल झालेल्या २७० फेरफार अर्जापैकी ४८ अर्ज मंजूर झाले असून, उर्वरित अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या गतीमान कार्यवाहीमुळे तालुक्यातील अनेक खातेदारांना लवकरच अद्ययावत सातबारा मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 09/May/2025