श्रेणी सुधारण्यासाठी यंदाच्या वर्षापासून बोर्डाकडून मिळणार विद्यार्थ्यांना तीन संधी

रत्नागिरी : सर्व विषयात उत्तीर्ण होउनही समाधानकारक गुण न पडल्यामुळे जे विद्यार्थी श्रेणी, गुण सुधारण्यासाठी परीक्षेला बसू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाच्या वर्षापासून तीन संधी देण्यात येणार असल्याची माहिती कोकण बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी जून-जुलै २०२५, फेब्रुवारी मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येणार आहे. बारावी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण व माहितीची प्रत संकेतस्थळावरून प्रिंट काढून घेता येणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून प्रथमच डीजी लॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व उत्तर पत्रिका छायाप्रतीसाठी दि. ६ मे ते २० मे पर्यंत ऑनलाईन पध्दतीचे अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पध्दतीने शुल्क भरता येणार आहे. फेब्रुवारी मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या ५ दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून ऑनलाईन अर्ज शुल्कासह सादर करावा.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी विभागीय मंडळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सहसचिव दीपक पवार, सहाय्यक सचिव मनोज शिंदे उपस्थित होते.

कॉपीमुक्त अभियानामुळे कॉपीच्या प्रमाणात घट
यावर्षी बोर्डातर्फे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी कॉपीचे प्रमाण कमी झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक प्रकार घडला आहे. यापुढेही कॉपीमुक्त अभियान सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आहे.

बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन प्रक्रिया सुरू : मंडळाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अर्ज प्रक्रियेबाबतचा अधिकृत कार्यक्रम मंडळाने जारी केला असून, संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालकांनी ही माहिती लक्षात घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबतची माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी कळवली आहे. विद्यार्थ्यांनी ही संधी लक्षात घेऊन वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 09/May/2025