देवरुख : अमली पदार्थ सेवन केल्याने एक प्रकारची धुंदी येते. या व्यसनामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. यासाठी वयात येणाऱ्या तरुणपिढीला वेळीच अशा अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम प्रत्येक पालकांनी मुलांना समजावून सांगावे व वेळीच सावध करून एक निर्व्यसनी नागरिक तयार करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा, असे प्रतिपादन संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील कडवई महाराष्ट्र उर्दू हायस्कूल येथे एज्यूकेशन सोसायटी कडवई व संगमेश्वर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमलीपदार्थ, ड्रग, गांजा सेवनामुळे होणारे दुष्परिणाम विषद करण्यासाठी पालक व ग्रामस्थांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. त्यामध्ये विशेषतः तरुणपिढी बळी पडताना दिसत आहे. मग अमली पदार्थांसारख्या गोष्टी सेवन करण्याकडे तरूण पिढीचा कल जास्त प्रमाणात दिसून येतो. गांजा, ड्रग्ज, गुटखा असे विनाशकारी पदार्थ माणसांचे जीवन उद्ध्वस्त करतात.
अमलीपदार्थ चोरून विकण्याचा धंदा करू नये. या धंद्यात अमाप पैसा मिळाला तरी कुंटुबात कोणी समाधानी व सुखी कधीच होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. कायम भीतीच्या ओझ्याखाली वावरून गुन्हेगार म्हणून कधीतरी नक्की वेळ येणार ही गोष्ट चुकत नाही. तरुणपिढीला उद्ध्वस्त करणारे व्यवसाय बंद करून उदरनिर्वाहासाठी चांगले व्यवसाय करावेत. म्हणजे कुटुंब, तरुणपिढी नक्की सुखावेल असे उपअधीक्षक पारवे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी मनसेचे जितेंद्र चव्हाण, उपसरपंच दत्ताराम ओकटे, अन्सार जुवळे मुख्याध्यापक रिजवान कारीगर, मुख्याध्यापक प्रांजल मोहिते, कडवई रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, पोलिस पाटील संजय ओकटे, कडवई गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 09/May/2025









