रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांची नगर वाचनालयात क्षेत्रभेट

रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास शैक्षणिक क्षेत्रमेट दिली. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे आधुनिक जगाप्रमाणे अपडेट असल्यामुळे आणि तेथील सर्व सुविधा पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. वाङ्मय मंडळांतर्गत मराठी. हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीचे आयोजन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी वाचनालयामधील कार्यपद्धती, पुस्तकांच्या वर्गीकरणाची प्रक्रिया आणि वाचनालयाचा सर्वांगीण उपयोग, वाचनाचे महत्व आणि संशोधन प्रक्रियेतील वाचनालयाचे योगदान जाणून घेतले. क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या विविध विभागांबद्दल माहिती देण्यात आली. ग्रंथपाल मीनल हळदणकर व मानसी मराठे, इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथसंपदा, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, ई-बुक्स आणि डिजिटल संसाधनाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वर्गीकरण पद्धती जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन आणि संशोधनासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पुस्तकांचा असलेल्या सुविधांची पाहणी केली. वाचनालयातील डिजिटल ई-पुस्तक प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीचा अनुभव घेतला.

या क्षेत्रभेटीस प्र. प्राचार्या मधुरा पाटील, प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. गौरी बोटके आणि प्रा. वीणा कोकजे उपस्थित होत्या. यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे कलाशाखेचे सर्व विद्यार्थी, प्रथम वर्ष विज्ञान शाखेचे इंग्रजी विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले. भेटीसाठी वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, ग्रंथपाल यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 10/Oct/2024