रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने कोरोना महामारी नंतरच्या आव्हानात्मक काळातून यशस्वीपणे मार्ग काढत प्रगतीचा मार्ग स्वीकारला आहे. मागील चार वर्षे समितीला आर्थिक संकट, कर्मचारी वेतन, शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि निधीच्या कमतरतेसारख्या अडचणींचा सामना करावा लागला. सलग चार वर्षे तोट्यात असलेली ही समिती 2023 मध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या नियुक्तीनंतर प्रगतीपथावर परतली आहे.
कोरोना महामारीमुळे समितीचे उत्पन्न लक्षणीयरीत्या घटले होते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी समितीला प्रचंड संघर्ष करावा लागला. 2023 मध्ये नवीन संचालक मंडळाने हलाखीच्या परिस्थितीतही धैर्याने जबाबदारी स्वीकारली. अनेक अडचणींचा सामना करताना, मंडळाने कर्मचारी वर्गाचा अनुभव आणि सहकार्याची भूमिका यांचा उपयोग करत प्रत्येक समस्येवर तोडगा शोधला. शासन आणि पणन मंडळाकडील थकीत रकमांची पूर्ण परतफेड करून आर्थिक स्थैर्य साधले.
या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, 31 मार्च 2025 अखेर समितीने 12 ते 15 लाख रुपये नफा कमावला. हे यश संचालक मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि योग्य नियोजनाचे फलित आहे. सभापती श्री. सुरेश भिकाजी सावंत, उपसभापती सौ. स्नेहल स. बाईत आणि सर्व संचालकांनी या यशात मोलाचे योगदान दिले. सहकार पॅनेलचे डॉ. तानाजीराव चोरगे यांनी प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले.
कर्मचारी, परवानाधारक, शेतकरी आणि वरिष्ठ कार्यालयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे समितीला नवीन दिशा मिळाली. समितीला आपले घर समजून सर्वांनी जबाबदारी आणि अधिकार यांची सांगड घातली. सभापती श्री. सावंत यांनी लोकप्रतिनिधींना समितीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांचे हित आणि समितीचा विकास यासाठी हे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 09-05-2025














