खेड : शासनाच्या अचानक बदललेल्या वाळू धोरणामुळे कोकणातील सरकारी वाळू डेपोमध्ये पडून राहिलेल्या वाळूचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारी मक्ता घेतलेल्या व्यावसायिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून डेपो उभारले, वजन काटे, केबिन, सीसीटीव्ही यांसारख्या सुविधा बसवल्या, मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता. मात्र, धोरण बदलल्याने ही वाळू विक्रीविना धूळखात पडून आहे.
सरकारने काही निवडक मक्तेदारांसोबत मिळून वाळू वितरणासाठी अधिकृत सरकारी डेपो सुरू केले होते. त्यासाठी संबंधित मक्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, सरकारने अचानक वाळू धोरणात बदल करताच, या डेपोंवर हजारो ब्रास वाळू साठा पडून राहिला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिर्शी गावातील डेपोमध्ये जुलै २०२४ पासून तब्बल १,१४२.७१ ब्रास वाळू खुल्या मैदानात पडून आहे.
खेडचे तहसीलदार यांनी यासंदर्भात १४ जानेवारी २०२५ आणि २९ एप्रिल २०२५ रोजी खेडचे प्रांताधिकारी यांना लेखी पत्र पाठवून वाळू साठ्याबाबत मार्गदर्शन मागवले होते. मात्र, महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट सूचना आलेली नाही. त्यामुळे ही वाळू न केवळ निकामी झाली आहे, तर काही प्रमाणात चोरीलाही गेल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे वाळू व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या मक्ताधारकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सरकारलाही कोट्यवधी रुपयांच्या महसुली नुकसानाचा फटका बसला आहे. यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. सरकारने जर लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घेतला नाही, तर भविष्यात वाळू व्यवसायाकडे कोणतीही गुंतवणूकदार किंवा स्थानिक पुढाकार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे.
महसूल मंत्री ना. योगेश कदम लक्ष देणार का?
कोकणात गेले वर्षभर वाळू धोरण निश्चित झाले नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला. मात्र वाळू चोर वाळूचा व्यवसाय करून नागरिकांना चढ्या भावाने वाळू विकत होते. राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या मतदार संघाचं दापोली व खेड मध्ये नैसर्गिकरित्या नद्या व खाडी पात्रात उत्तम दर्जाची वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल सरकारी तिजोरीत जमा होत होता. मात्र वाळू धोरण निश्चित होई पर्यंत पावसाळा जवळ आला असल्याने यावर्षीचा महसूल पूर्ण पणे बुडाला असल्याने यापुढे तरी महसूल राज्यमंत्री ना. योगेश कदम याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 13/May/2025














