रत्नागिरी : गेली ४२ वर्षे मी शेती करत असून, रासायनिक खताबरोबर नैसर्गिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. टप्प्याटप्प्याने सेंद्रिय खतांचा वापर वाढवत नेत रासायनिक खतांचा वापर बंद करणे शेतमाल उत्पादनासाठी योग्य ठरेल.
शेतीतील अधोगतीला सामोरे जाण्याऐवजी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रगतशील शेतकरी हेमंत फाटक यांनी केले. रत्नागिरी तालुका कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा शिरगाव येथील भात संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हेमंत फाटक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषितज्ज्ञ संदीप कांबळे उपस्थित होते.
विनोद हेगडे यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके, लागवड पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.
कृषितज्ज्ञ संदीप कांबळे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली. यावेळी दृक-श्राव्य दृक-श्राव्य माध्य माध्यमातून पाणी फाउंडेशनतर्फे गटशेतीबाबत माहिती देण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी पीक संग्रहालयास भेट देऊन भाताच्या वाणाबाबत माहिती घेतली. यावेळी आत्मा विभागाच्या बीटीएम हर्षला पाटील, संकेत पवार उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत निवड झालेले क्षेत्र उत्पादक कंपनीचे सदस्य, पी.एम.एफ.एम.इ.अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी व गटाचे सभासद, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 13/May/2025









