राजापूर : कोकणातील हापूस आंब्याची जगभर ख्याती आहे. कोकणी माणसाच्या हातामध्ये पैसा मिळवून देणाऱ्या हापूस आंब्याच्या खरेदी-विक्रीतून दरवर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सर्वसोयींनीयुक्त प्रशस्त बाजारपेठ नसल्याने येथील बागायतदारांना आपला माल कोकणच्या बाहेर जावून दलालांमार्फत विकावा लागत आहे. त्यामध्ये काहीवेळा दरामंध्ये फसवणूकही होत असते.
कोकणातील शेतकऱ्यांना आपला माल थेट विकता यावा व त्यांना चांगला फायदा व्हावा यासाठी सहकाराच्या धर्तीवर मार्केटयार्डसारखी बाजारपेठ विकसित करावी अशी मागणी भाजपाचे राजापूर पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष मोहन घुमे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन घुमे यांनी फडणवीस यांना दिले आहे.
कोकणात पिकणाऱ्या या हापूसच्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवर प्रशस्त बाजारपेठ विकसित झाल्यास बागायतदार, शेतकरी यांना आपला माल आपल्या गावामध्ये बसून अपेक्षित हमीभावाने विक्री करणे शक्य होणार आहे असेही घुमे यांनी या निवेदनात नमुद केले आहे.
हापूस हंगामी उत्पादन असल्याने त्यामध्ये काही मर्यादा येण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. मात्र, हापूस आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मार्केटयार्डसारखी बाजारपेठ विकसित झाल्यास बागायतदार, शेतकरी यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. त्याचवेळी सर्वांना विविध भागामध्ये उत्पादीत होणारा माल एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या बाजूला हापूस आंबा खरेदीसाठी देश-परदेशातील खरेदीदार कोकणामध्ये येतील. त्यातून, विविध प्रकारची आर्थिक उलाढाल, खरेदी-विक्री, पर्यटन यालाही चालना मिळेल.
या साऱ्या बाबींचा सकारात्मक विचार होवून स्थानिक पातळीवर सहकाराच्या धर्तीवर मार्केटयार्डसारखी बाजारपेठ विकसित व्हावी अशी मागणी घुमे यांनी या निवेदनात केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 13/May/2025












