राजापूर : कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची आता अंतिम घटका सुरू झाली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर आता दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात हापूस पाठवणे बागायतदारांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. मात्र, कॅनिंग उद्योगाने बागायतदारांना काहीसा दिलासा दिला आहे.
कॅनिंगसाठी मिळणारे दर समाधानकारक असले तरी, प्रतिकूल हवामानामुळे यंदा हापूसचे उत्पादन सुमारे २५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे कॅनिंगसाठी पुरेसा आंबा उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील बदलांपासून आंब्याचे संरक्षण करण्यासाठी वारंवार करावी लागणारी औषध फवारणी आणि त्याचा खर्च यामुळे बागायतदारांना नफा-तोट्याचे गणित जुळवणे कठीण झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला हापूसला चांगला भाव मिळाला होता. चार डझनच्या पेटीला ८ ते ९ हजार रुपये इतका दर मिळत होता. मात्र, मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात हे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्या बाजारात प्रति पेटी सरासरी ८०० ते ९०० रुपये दर मिळत असल्याने, वाहतूक आणि इतर खर्च पाहता आंबा बाजारात पाठवणे बागायतदारांना परवडणारे नाही.
याउलट, कॅनिंगसाठी बागायतदारांना प्रति किलो ३२ ते ३४ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात शिल्लक राहिलेला आंबा कॅनिंगसाठी देण्याकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. गेल्या चार दिवसांत कॅनिंगच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. मात्र, अनेक बागायतदारांकडे कॅनिंगसाठी देण्यासाठी पुरेसा आंबा उपलब्ध नाही.
अंतिम टप्प्यात कॅनिंगवर जोर
मे महिन्यात दरात मोठी घसरण झाल्यामुळे बागायतदार आणि व्यापारी आता कॅनिंगवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. एरव्ही या काळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु, यंदा आंबा उत्पादन घटल्याने कॅनिंग उद्योगाला पुरेसा माल मिळत नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्यतः दिवसाला सरासरी दहा टन आंबा कॅनिंगसाठी येत होता, तर यावर्षी ५०० किलो आंबा मिळणेही कठीण झाले आहे.
आंबा पेटीत भरणे आणि तो बाजारात पाठवण्याचा खर्च आणि मिळणारा दर यात मोठी तफावत असल्याने, सध्याच्या स्थितीत बाजारात आंबा पाठवणे बागायतदारांना अधिक त्रासदायक ठरत आहे. यावर्षी कॅनिंगसाठी चांगला भाव मिळत असला तरी, देण्यासाठी आंबाच नसल्याची खंत आंबा बागायतदार संदेश शिंदे यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 14/May/2025














