रत्नागिरी : कासवाच्या पिलांना मायक्रो चिपिंग केल्यास माग काढणे शक्य

रत्नागिरी : सागरी कासवे अंड्यातून बाहेर पडल्यावर समुद्राकडे जाताना त्यांच्या मेंदूत भूचुंबकीय नकाशांची नोंद केली जाते. त्यामुळे वयात आल्यावर माद्या हजारो किलोमीटर प्रवास करून त्याच किनाऱ्यावर नियमित घरटी करण्यासाठी येतात, असे राष्ट्रीय स्तरावरून झालेल्या अभ्यासातून नोंदविण्यात आले आहे. कासव संवर्धन सुरू झाल्यानंतर १५ ते २० वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर कासवांच्या घरट्यांची संख्या वाढली असल्याने या पिलांपैकी मादी कासव या किनाऱ्यांकडे अंडी घालण्यासाठी परतली असावीत, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो.

ओडिशा, केरळ आदी ठिकाणी झालेल्या अभ्यासावरून पिलांना ज्या किनाऱ्यावरून सोडले जाते, त्या किनाऱ्यावर त्यापैकी वयात आलेली मादी कासव अंडी घालण्यासाठी येत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रत्नागिरीतही असा अभ्यास होण्यासाठी सोडल्या जाणाऱ्या पिलांना मायक्रो चिपिंग होणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे.

कासवाचे आयुष्य ८० ते १०० वर्षाचे असते. पण हजारो मैलाचा प्रवास त्याचा एकट्याचाच असतो. त्यामुळे पिलही जन्माला आल्यानंतर एकटी फिरतात. एवढेच नव्हे तर किनाऱ्यावर घरटी करून अंडी घातल्यानंतर मादीही पुन्हा त्या किनाऱ्याकडे फिरकत नाही. त्यामुळे पिलांचा जन्म झाल्यानंतर हजारो पिलांना मायक्रो चिपिंग करावे लागेल. तरच त्यापैकी इथल्या किनाऱ्यावर परतणाऱ्या मादींची संख्या कळण्यास मदत होऊ शकते.

मायक्रो चिपिंग गरजेचे…
समुद्राकडे कासवाच्या पिलांना सोडतानाच त्यांचे मायक्रो चिपिंग केले तर कालांतराने अंडी घालण्यासाठी परतलेली मादी कासवांची ओळख पटू शकेल, असे मत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे सदस्य आणि रत्नागिरी आणि रायगड कांदळवन कक्षातर्फे संशोधनात्मक काम करणारे मोहन उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे.

ऋतूंवर जन्म अवलंबून…
नोव्हेंबर ते मार्च हा कासवांच्या अंडी घालण्याचा काळ असतो. यापैकी डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत नर जन्माला येतात तर फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्यांपैकी ५० ते ६० टक्के नर असतात. तर मार्च, एप्रिलमध्ये जन्म घेणारी पिले मादी असतात, असाही मनोरंजनात्मक अभ्यास कासवांच्या जन्माबाबत करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 14/May/2025