रत्नागिरी : गुणपत्रक म्हणजे आयुष्याचा ताळेबंद नव्हे. दहावीची परीक्षा ही अंतिम परीक्षा नसते, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे. यशाचा एक दरवाजा बंद झाला तरी तुम्हाला अनेक दरवाजे खुणावत असतात. नापास विद्यार्थ्यांना सन्मानाने जगण्यासाठी समाजाने त्यांच्या कौशल्य क्षमतांचा विकास केला पाहिजे. नापासांसाठी वेगळी शाळा काढण्याचा प्रयोग राबवण्याची गरज आहे. त्यांना मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.
ते म्हणाले की, राज्यात बारावीमध्ये १ लाख १५ हजार ९६, तर दहावीमध्ये ९१ हजार १४६ असे मिळून महाराष्ट्रात यावर्षी एकूण २ लाख ६ हजार २४२ विद्यार्थी नापास झाले. विद्यार्थ्यांना नापास करून त्याच वर्गात ठेवल्याने शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होते, असं कोणतेही संशोधन सिद्ध करत नाही. उलट कपाळावर नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. आइन्स्टाईन, कुसुमाग्रज, अभिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही मोठी माणसं आयुष्यात कधी ना कधी परीक्षेत नापास झालीच होती.
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेत २०१२ मध्ये स्थापन झालेल्या कोकण बोर्डाने ९८.८२ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात सतत चौदाव्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातत्याने शिखरावर राहणे कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन व परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित केले आहे, असेही अॅड. पाटणे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 14/May/2025














