खेड : खेड तालुक्यात काही गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढत आहे. टंचाईग्रस्त बाड्यांना शासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना गाव भरणे सुकीवली जोडणाऱ्या चोरदाच्या पुलाजवळील नदीतून पाणी पंपाद्वारे उचलून ते शासकीय टँकरने पाणी टंचाईग्रस्त वाड्यांना पाठवले जाते. अशी तक्रार महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी खेड तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
चोरदाच्या पुलाजवळ ज्या ठिकाणावरून पाणी उचलले जाते, त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्या नदीतील पाण्याच्या डोहात शिरून धुतल्या जात आहेत. तसेच भरणे व सुकीवली गावातील महिला भगिनी याच ठिकाणी कपडे धुवत असतात. हे दूषित पाणी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला पाजून शासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे. मागील अनेक वर्षे हे नित्यनेमाने चालू आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का, हे शासनाच्या आरोग्य विभागाने तपासूनच पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना हे सर्व नियम धाब्यावर बसवून शासनातर्फे पाणीपुरवठा केला जात आहे.
खेड तालुक्यात पाणीपुरवठा योजनांवर प्रचंड शासकीय निधी खर्च होत आहे. परंतु पाणी समस्या कमी होण्याऐवजी प्रत्येकवर्षी वाढतच जात आहे. शासनाने जनतेची पाणी समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजना आणली. काही ठिकाणी बाजतगाजत पाणी योजनांच्या कामांची भूभिपूजने व उद्घाटने केली परंतु काही गावांत जलजीवन योजना पूर्ण होऊनही स्थानिक ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे.
अनेक गावांत जलजीवन मिशन योजनांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली असल्याने खेड तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलजीवन मिशन योजनांच्या कार्मावर शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचा अंकूश नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्च होत आहेत. खेड तालुका टँकरमुक्त केव्हा होणार असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 15/May/2025














