बांगलादेशातील सतखीरच्या जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा मुकुट चोरीला गेला आहे. हा मुकुट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पण केला होता. गुरुवारी दुपारी पुजारी पूजा करून बाहेर गेल्यावर ही घटना घडली आहे.
पुजारी बाहेर जाण्याची आणि सफाई कर्मचारी आतमध्ये येण्याची वेळ चोरट्यांनी साधल्याने खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रात ही घटना घडली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी २०२१ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना हा सोन्या-चांदीचा मुकुट जेशोरेश्वरी देवीला अर्पण केला होता. पुजारी दिलीप मुखर्जी यांनी याची माहिती दिली. दिवसभर पूजा करून ते दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले. यानंतर काही वेळाने स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्यासाठी आले. काही वेळाने त्यांनी देवीकडे पाहिले असता तिच्या डोक्यावरील मुकुट गायब झालेला त्यांना दिसला. मुकुट चांदीचा होता तर त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला होता.
हे मंदिर हिंदू धर्माच्या ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. श्यामनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर तैजुल इस्लाम यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोराला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिराची आख्यायिका…
अनारी नावाच्या ब्राम्हणाने १२ व्या शतकात या मंदिराचे निर्माण केले होते. जशोरेश्वरी पीठासाठी त्यांनी १०० दरवाजांचे मंदिर बनविले होते. १३ व्या शतकात लक्ष्मण सेन यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. यानंतर राजा प्रतापादित्य यांनी १६ व्या शतकात या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. या ठिकाणी देवी सतीचे हात आणि पायाचे तळवे पडले होते असे सांगितले जाते. येथे जशोरेश्वरीचा वास आहे आणि भगवान शंकर चंद्राच्या रुपात तिथे प्रकट होतात, अशी मान्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 11-10-2024