मंडणगडमधील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील गर्भवती महिलांच्या मृत्यूप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा उचलला आहे. दोन वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी गुरुवारी दिली. कंत्राटी वाहन चालक, प्राथमिक आरोग्य सेवेतील देव्हारे येथील कंत्राटी वाहन चालक या दोघांना कामावर काढून टाकले आहे. ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.

मंडणगड येथील रुग्णालयात गर्भवती महिलेचा तिच्या बाळासह मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. मंडणगड रुग्णालयातून त्या महिलेला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवणे गरजेचे होते मात्र शासकीय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने खाजगी रुग्णवाहिकेतून तिला दापोलीला नेण्याची वेळ आली आणि प्रवासादरम्यान तिचा बाळासह मृत्यू झाला. या घटनेमुळे येथील जनतेने मोठा संताप व्यक्त केला. याप्रकरणी दोघा वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी समिती म्हणून उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, कामथे चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. असीम कुमार, डॉ. अभिषेक गावंडे यांनी काम पाहिले.

दोन दिवस चौकशी याप्रकरणी आरोग्य सहाय्यक उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी या स्तरावरील अधिकारी सलग दोन दिवस या प्रकरणाची चौकशी केली, सर्वांचे जबाब नोंदवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 16/May/2025