दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता.१५) ऑनलाइन अर्ज करता येत आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १५ ते २४ मे पर्यंत, तर विलंब शुल्कासह २५ ते २९ मे पर्यंत पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येतील, अशी माहिती राज्य मंडळाने दिली.

दहावीच्या परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

दहावीची पुरवणी परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरून भरता येणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येणार आहे; तर श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६ अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 16-05-2025