चिपळूण : दिल्लीतील एका कंपनीने वाशिष्ठी पुलाजवळ पाणी व जॅकवेल बांधण्याची चाचणी चालू केली आहे. याकरिता गेले दोन महिने कंपनीचे काही लोक कळंबस्ते हायस्कूल स्मशानभूमीजवळ काम करत आहेत.
कोयना व वाशिष्ठीचे पाणी रेल्वेपटरीच्या बाजूने मुंबई व राजापूर-नाणार प्रकल्प येथे नेण्यात येणार असल्याचे समजते.
त्यानुसार या कामाच्या सव्र्व्हेला सुरवात झालेली आहे; मात्र जोपर्यंत कोकण रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात नाहीत तोपर्यंत आम्ही वाशिष्ठीचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.
याबाबत माहिती देताना मुकादम म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वेमार्ग, चिपळूण-दादर स्वतंत्र गाडी, वंदे भारतसह काही गाड्यांना चिपळूणला थांबे, असे आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय वाशिष्ठी नदीचे पाणी व त्या ठिकाणी बांधण्यात येणारी मोठी जॅकवेल व बंधारेचे काम आम्ही होऊ देणार नाही. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका. प्रकल्पाच्या सर्व्हचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु त्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला.
प्रकल्पाचा सर्व्हे होण्यापूर्वी रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, अशी हरकत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी घेतली. यामुळे काम अर्धवट सोडून कंपनीचे कर्मचारी निघून गेल्याचे समजते. स्थानिक ग्रामपंचायतीला वरील खात्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन वाशिष्ठीचे पाणी उचलून मुंबईला नेत असल्याची माहिती दिल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे, असेही मुकादम यांनी सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 17/May/2025














