गुहागर : आरजीपीपीएल मधून १३०० मेगावॉट वीजनिर्मिती

गुहागर : गॅसच्या वाढलेल्या किमती आणि विजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता; परंतु राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा आजही प्रतिसाद मिळालेला नाही. येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणीनुसार वीजनिर्मिती करत आहे. गेले तीन आठवडे प्रकल्पातून दोन टप्प्यांत १३०० आणि ४०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे.

तालुक्यातील अंजनवेल या ठिकाणी उभारण्यात आलेला एन्रॉनचा दाभोळ वीज प्रकल्प आणि आताचा रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प १९९५ साली सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या काळात वादग्रस्त ठरता होता. सध्या एनटीपीसी या कंपनीतील प्रमुख भागधारक आहे, तर राज्य वीज कंपनीचे भागभांडवल खूपच कमी आहे. गॅसवर चालणारा हा प्रकल्प देशातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे.

किल्फायतशीर दराने अखंडित गॅस पुरवठा झाल्यास या प्रकल्पातून कमी दराने वीजनिर्मिती होऊ शकते. त्यासाठीच केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. एकीकडे विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा लक्षात घेता नैसर्गिक वायूवरील हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे. गतवर्षी केंद्र सरकारने हा प्रकल्प टिकला पाहिजे, म्हणून केंद्रीय ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मात्र, या बैठकीनंतर कोणतीही कार्यवाही झालेली दिसली नाही.

वीज दरवाढीमुळे तत्कालीन फडणवीस सरकारने प्रकल्पातून वीज घेणे बंद केले होते. त्यानंतर कंपनीने रेल्वेबरोबर ५०० मेगावॉटचा करार करून प्रकल्प सुरू ठेवला. सरकारने नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी, रेल्वेबरोबरचा करारही संपुष्टात आला. महागड्या दरामुळे नवीन वीज खरेदी करार झाला नाही.

काही उद्योगांची मागणी
सध्या काही उद्योगांच्या मागणीनुसार कंपनी व्यवस्थापन वीज निर्मिती करत आहे. बार गॅस टर्बाईन आणि दोन स्टीम टर्बाईनमधून सायंकाळी ६ ते रात्री १२.३० या वेळेत १३०० मेगावॉट, तर रात्री १२.३० ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४०० मेगावॉट वीज तयार करून ती विकली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 17/May/2025