जांभारी बंदरात सिंधुरत्न समृद्ध योजना उमेदच्या हाऊस बोटीचे उद्घाटन

रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्ध योजनेतून उमेदच्या हाऊसबोटीचे उद्घाटन जांभारी बंदरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊसबोटीचे लोकार्पण होत आहे.

पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे लागेल. महिला भगिनींनी पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक दिली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. केरळपेक्षा चांगल्या पद्धतीचे भाट्ये पुल येथे टर्मिनल तयार करू. पुढच्या दोन वर्षांत महिलांच्या हाती 10 हाऊस बोटी असतील. त्या फक्त महिला चालवतील. भाट्ये येथे 3 हाऊस बोटी महिलांच्या हातात दिल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली.जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुरत्न समृद्ध योजना 2023-24 पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना ही हाऊसबोट देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डीआरडीएचे प्रकल्प संचालक विजय जाधव, गटविकास अधिकारी चेतन शेळके, बाबू म्हाप, सरपंच आदेश पावरी आदी उपस्थित होते.

उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बोटीची पाहणी केली. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, एक कोटीची बोट महिला बचत गट चालविणार आहे. भाट्ये येथे 3 बोटी देणार असून, त्यातून महिलांना रोजगार दिला जाईल. महिला भगिनींकडून हाऊस बोट चालवणारा देशातला हा आदर्शवत प्रकल्प आहे. महिला सक्षमपणे काम करत आहेत, त्याचा अभिमान सर्वांना असला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांनी बचतगटाचे काम सक्षमपणे करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. रत्नागिरीत नव्याने झालेल्या बसस्थानकामध्ये बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल उभारला जाईल. युद्धजन्य परिस्थितीची माहिती 2 महिला अधिकारी जगाला देत होत्या. त्यातही सोफिया कुरेशीसारखी महिला नेतृत्व करते, हा आपला सर्वांचा अभिमान आहे. देशातला सर्वांत चांगला चहा, त्याच्या विक्रीचे स्टॉल रत्नागिरीत महिलांना दिले जातील, असेही पालकमंत्री म्हणाले.कार्यकमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 19-05-2025