मंडणगड : शिपोळे वेसवी येथील इनामदार पब्लिक स्कुलचे विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे विरोधात पालकवर्ग एकत्रित

मंडणगड : शिपोळे वेसवी येथील इनामदार पब्लिक स्कुल शाळेच्या मान्यतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संस्था चालक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रशालेत 10 ऑक्टोंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या सभेत संस्थेच्यावतीने प्रशालेच्या विरोधात मांडण्यात आलेल्या विविध समस्यांविषयी खुलासा करण्यात आला असून पालकांनी वेसवी येथे नमुद संस्था चालवित असलेली शाळा कुठल्याही परिस्थिती आम्ही बंद होऊन देणार नाही. विघ्नसंतोषी व्यक्तींकडून तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास वेळप्रसंगी आम्ही त्यांचे विरोधात आंदोलन करु असा इशारा दिला आहे. प्रशालेत आयोजीत सभेस आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष शफी इनामदार यांनी सभेचे प्रस्ताविक करताना प्रशालेचे शैक्षणिक कामकाज व वाटचालीविषयी इंत्यभूत माहीती दिली. यामध्ये शाळेची मान्यता, शैक्षणिक पध्दती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रशालेत चालविले जाणारे विविध उपक्रम व पाच वर्षांमध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने प्रशालेने केलेली नेत्रदीपक कामगीरी याबद्दल पालकांना विस्ताराने माहीती दिली. तसेच विरोधकांकडून प्रशालेच्या कामकाजासंदर्भात करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले यानंतर या विषया संदर्भात सभेस उपस्थित पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रीया उमटल्या यामध्ये, प्रशालेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, व विद्यार्थ्यांभिमुख कामकाज याचे पालकांनी विशेष कौतूक केले. व या शाळेबाबत नकारात्मक भुमिका घेणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे विरोधातच आक्रमक प्रतिक्रीया दिल्या. आंदोलन करणारे ग्रामस्थ हे स्वतःहा अनेक वर्षापासून शिक्षण संस्था चालवित असताना त्यांना परिसरात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता असलेले शिक्षण का पुरविता आले नाही असा सतंप्त प्रश्न पालकांनी यावेळी उपस्थित केला. पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरीक मुश्ताक मिरकर यांनी शिक्षण विभागाचे कार्यपध्दतीवर ताशेरे ओढताना शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात टाकू नये असे सांगीतले.

अल्पसंख्याक बहुल विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेवर अन्याय करण्याचे व गळचेपीचे धोरण कोण अंगीकारत असले तर त्यांचा आम्ही प्रखर विरोध करु. शाळेच्या प्रशासकीय कामकाज योग्य पध्दतीने असताना तसेच पालक व विद्यार्थी शिक्षण बाबत पुर्ण समाधानी असताना केवळ विशिष्ठ हेतू व उद्देशाने शाळेची चुकीची माहीती समाजात पसरवली जात असल्याचा आरोप यावेळी केला. यावेळी वसिम कुरये, मौलना जावेद खतीब, सलिम परकार, जहीद डिंगणकर, जहीद परकार, रुकसाना इसाणे, बशीर महाडकर, बशीर मुल्ला, रफिक हव्वा, मन्सुर लांबे, यांच्यासह सभेस प्रशालेचे व्यवस्थापक श्री. राव, प्रभारी मुख्याध्यापिका अफिफा धनसे व पंचक्रोशीतील पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 11/Oct/2024