खेड : घरात घुसून केली मारहाण; कुटुंबीयांना गंभीर दुखापत

खेड : खेड तालुक्यातील मेटे (पो. असगणी) येथील मेटे मोहल्ल्यात ११ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन सत्तार बोट (वय ४५) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शोएब अख्तर शमशुद्दीन घारे, इरफान शोएब अख्तर घारे आणि कामील शोएब यांनी हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात १८ मे रोजी सायंकाळी ५:५३ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३३३, ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक १५१/२०२५ नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब, इरफान आणि कामील हे फिर्यादी शमशुद्दीन यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या मुली आणि आईला शिवीगाळ करत मारहाण करण्याच्या उद्देशाने आले. यावेळी फिर्यादीची मुलगी भांडणाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होती. याचा राग आल्याने इरफानने घरात घुसून तिला “मोबाइल बंद कर, नाहीतर तुला खल्लास करेन” अशी धमकी दिली. शोएबने फिर्यादीच्या आईला जमिनीवर ढकलले आणि मुलीच्या अंगावरील कपडे झटापटीत फाडले. तसेच तिला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत डोळ्यावर आणि डोक्यावर जखमा केल्या. त्याने तिला “तुझी जिंदगी खराब करेन” अशी धमकीही दिली.

याच वेळी शोएब आणि कामील यांनी लाकडी दांडके घेऊन फिर्यादी शमशुद्दीन यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून पाय, पाठ आणि डोक्यावर दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमा केल्या. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इरफानने पुन्हा घरात घुसून फिर्यादीच्या मुलीला मोबाइल बंद करण्याची धमकी देत झटापट केली. या घटनेत फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे मेटे मोहल्ल्यात तणाव निर्माण झाला आहे. खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 19-05-2025