जागा मालकांना वृक्ष अथवा फांद्या तोडण्याच्या चिपळूण पालिकेच्या नोटीसा

चिपळूण : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून शहरातील धोकायदायक वृक्ष व त्यांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे; मात्र बहुतांशी झाडे ही खासगी मालकीच्या जागेत आहेत. या मालकांना सूचना देऊनही अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने दुसऱ्यांदा नोटीस जाहीर करून, अशा जमीनमालकांना तातडीने धोकादायक वृक्ष व फांद्या तोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो. अतिवृष्टी काळात घरे, गोठे, इमारतीवर झाडे व त्यांच्या फांद्या कोसळून मोठी हानी होते. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प होते. या अनुषंगाने दरवर्षी चिपळूण पालिकेच्यावतीने मॉन्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. त्यामध्ये रस्त्यालगतची तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेली धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. यावर्षी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सतीश दंडवते,

प्रशासकीय अधिकारी मंगेश पेंढांबकर, कार्यालयीन अधीक्षक खाडे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांनी कामाचे उत्तम नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील मुख्य रस्ते व इतर भागातील सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या धोकादायक फांद्या तोडून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. खासगी जागेतील झाडे व त्यांच्या फांद्या अद्याप जमीनसंबंधित जमीनमालकांनी तोडल्याचे दिसून आलेले नाही. वादळ व अतिवृष्टीमध्ये हे वृक्ष अथवा फांद्या कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने संबंधित जमीनमालकांना आपल्या आवारातील, जागेतील धोकादायक वृक्ष अथवा त्यांच्या फांद्या तातडीने तोडून घेण्याची दुसर्यांदा सूचना केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना पडून वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असा इशाराही दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 20/May/2025